भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा गौतम बुद्धांच्या जीवनावर आणि बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानावर आधारलेला बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित प्रसिद्ध व अखेरचा ग्रंथ आहे. भारतातील नवयानी बौद्ध अनुयायांचा हा धर्मग्रंथ आहे. या ग्रंथावर आधारित अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध हा चित्रपट सुद्धा बनवलेला गेला आहे. इ.स. १९८९ साली महाराष्ट्र सरकारच्या शैक्षणिक विभागाने डॉ. आंबेडकरांचे एकत्रित लेखन व भाषणांची सूत्रे आणि निर्देशांकाची यादी म्हणून हा ग्रंथ पुन्हा प्रकाशित केला. या ग्रंथाला बौद्ध धर्माचे धर्मशास्त्र म्हणता येईल. या विशाल ग्रंथात बौद्ध धर्माची विवेचना विशद केली आहे. आंबेडकर साहित्याचे विद्वान डॉ. डी. आर. जाटव यांच्या मते ‘‘हा ग्रंथ अनेक मौलिक प्रश्नांना प्रस्तुत करतो ज्याचे डॉ. आंबेडकरांनी मोठ्या बुद्धिमत्तेसह उत्तर दिले आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हे पुस्तक बौद्ध धर्माच्या आधुनिक विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांचे उत्तर म्हणून लिहिले आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनामध्ये, लेखकाने चार प्रश्नांची सूची दिली आहे.