Browse Results

Showing 1,026 through 1,050 of 1,427 results

Savad Raha Jagaruk Vha!: सावध रहा, जागरूक व्हा!

by Reserve Bank Of India

गेल्या काही वर्षांत, डिजीटल माध्यमांचा वापर करून पैसे देवाण घेवाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे ग्राहकांच्या सोयीसुविधेत तर भर पडली आहेच, शिवाय आर्थिक समावेशनाचे राष्ट्रीय उद्दीष्ट गाठण्यातही मोठा हातभार लागला आहे. परंतु आर्थिक व्यवहारांत सुलभता येण्याबरोबरच यामार्फत होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. सर्वसामान्य, भोळ्या-भाबड्या नागरिकांनी मोठ्या स्वकष्टाने कमावलेले पैसे लुबाडण्यासाठी आर्थिक गुन्हेगारांकडून नवनवीन मार्गांचा अवलंब केला जात आहे. या गुन्हेगारांकडून मुख्यत: सध्याच्या तंत्रज्ञानाभिमुख आर्थिक व्यवहारांच्या जगाशी नव्यानेच ओळख होत असलेल्या व्यक्तींना लक्ष्य केले जाते. अशा या आर्थिक व्यवहारांसाठी नव्यानेच डिजिटल माध्यमे वापरणाऱ्या नवख्या ग्राहकांना केंद्रस्थानी ठेऊन या पुस्तिकेची रचना करण्यात आली असून यासंदर्भात जास्तीत जास्त व्यावहारिक पद्धतीने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात आला आहे.

Agarkar Vangamay Khand 2: आगरकर-वाङ्मय खंड २

by M. G. Natu D. Y. Deshpande

विवेकवादाचे अध्वर्यू गोपाळ गणेश आगरकर यांचे सर्व प्रकाशित ग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ एकूण तीन खंडांत पुनर्मुद्रित करीत आहे. त्यांपैकी हा दुसरा खंड. आगरकरांच्या सुधारक पत्रातील समाजिक, धार्मिक व राजकीय विषयांवरील निवडक निबंधांचे जे तीन संग्रह १८९५ ते १९१८ या कालावधीत प्रसिद्ध झाले त्या सर्व निबंधांचा समावेश आम्ही पहिल्या दोन खंडांत केला असून त्याला ‘सुधारणा विभाग’ हे नाव दिले आहे. प्रस्तुत खंड २ हा या सुधारणाविभागाचा उत्तरार्ध आहे. या सुधारणाविभागाची ‘विवेकाधिष्ठित सर्वांगीण सुधारणेचे उद्‌गाते—गोपाळ गणेश आगरकर’ ही विस्तृत प्रस्तावना पहिल्या खंडात दिली असून, या दोन्ही खंडांत मिळून आलेल्या निबंधांची, व्यक्तिनामांची व विषयांची अशा एकूण तीन सूची या खंडाच्या शेवटी दिल्या आहेत.

Savitribai Phule Kal Ani Kartrutva: सावित्रीबाई फुले काल आणि कर्तृत्व

by Pro. Dr. M.G. Mali Mrs Neela Upadhye Dr Nirmal Kumar Fadkule Dr Subhash Savarkar

“क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, – काल आणि कर्तृत्व” हे पुस्तक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केले आहे. स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार करणारा हजारो वर्षांपूर्वीचा वेदांचा काळ लगेच संपला. पुरुषप्रधान संस्कृतीचे जणू तमोयुगच मध्यंतरी अवतरले. वेदांचे अध्ययन स्त्रीशूद्रादी सर्व मानवांनी करावे असे सांगणारे यजुर्वेदाचे आदेशही हे तमोयुग विसरले आणि स्त्री व शूद्र ह्यांचे नशिबी दुर्दैवाचे दशावतार भोगणे आले. उच्चवर्णीयात मोडणाऱ्या जातींनी स्त्री व शूद्र ह्यांना पशूहूनही हीन दर्जाची वागणूक दिली. वंदनीय सावित्रीबाईंनी प्रथमच ह्या उच्चवर्णीय जातींच्या वर्तनाविरुद्ध क्रांतीचे निशाण फडकविले. त्यांच्या चरित्राचे व चारित्र्याचे विविध पैलू सोदाहरण उकलून दाखविणारे लेख ह्यात अंतर्भूत केलेले आहेत. सावित्रीबाईंची केवळ स्मृती जागवणे नव्हे तर स्मृतीत अभिप्रेत असलेली कृती देखील घडावी हा हेतू ह्या पुस्तक प्रकाशनामागे आहे.

Kai. Veer Vamanrao Joshi Hyanchi Natake: कै. वीर वामनराव जोशी ह्यांची नाटके

by Dr Madhukar Ashtikar

नाटककार म्हणून वीर वामनराव जोशी महाराष्ट्रात गाजलेच. त्यांची नाटके रंगली. लोकांनी डोक्यावर घेतली. त्यातली गाणी ओठाओठांवर रुळली. कित्येक बुडत्या नाटककंपन्यांची नौका सुखरूप किनाऱ्याला लागली. पण ह्या वैदर्भीय नाटककाराची समीक्षकांनी मात्र तशी उपेक्षाच केली. पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. मु. श्री. कानडे ह्यांनी लिहिलेल्या ‘कालचे नाटककार’ ह्या पुस्तकात त्यांच्यावरचा एक लेख, एवढीच दादांच्या नाटकावरची उपलब्ध समीक्षा! बाकी किरकोळ प्रासंगिक वजाबाक्या आणि ऐतिहासिक पठाणी खाक्याच्या नोंदीच त्यांच्या नशिबी आल्या. म्हणूनच कै. वीर वामनरावदादांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात त्यांच्या नाटकांची समीक्षा व्हावी आणि त्यांची संहितादेखील रसिकांना उपलब्ध रहावी ह्या हेतूने साहित्य संस्कृती मंडळाने प्रस्तुत पुस्तक कै. वीर वामनराव जोशी ह्यांची नाटके, एक समीक्षा व संपादित नाट्य संहिता - अशा स्वरूपात ती तयार केली आहे.

Prabodhankar Thakare Samagra Wangmay Khand 4: प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्‌मय खंड ४

by Prabodhankar Thakare

प्रबोधनकार कै. केशव सीताराम ठाकरे यांचे समग्र साहित्य खंडरूपाने प्रसिद्ध करण्याचे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने ठरविले होते. प्रबोधनकार ठाकरे हे हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्म यांचे जाज्वल्य अभिमानी होते. प्रस्तुतच्या या चौथ्या खंडात एकूण तीन भाग आहेत. पहिल्या भागात (हिंदु धर्माचे दिव्य आणि संस्कृतीचा संग्राम) आजच्या हिंदू धर्माची अवगत अवस्था आणि त्याची कारणे यांचा त्यांनी ऊहापोह केला आहे. तसेच मुसलमानी आक्रमणानंतरची या देशाची हीनदीन, पौरुषहीन अवस्था कशी प्रकट झाली याचेही विश्लेषण त्यांनी मोठ्या पोटतिडकीने केले आहे. दुसरा भाग “हिंदुजनांचा ऱ्हास आणि अधःपात”या शीर्षकाने प्रसिद्ध झाला आहे.

Samajashastriya Vicharatil Pramukh Pravah Bhag 1: समाजशास्त्रीय विचारातील प्रमुख प्रवाह भाग १

by Hemkant Venkatesh Balakundi

समाजशास्त्रीय विचारांतील प्रमुख प्रवाह हा रेमंड ऑरॉं या फ्रान्समधील विचारवंताच्या ग्रंथाचा श्री. हेमकांत वेंकटेश बलकुंदी यांनी केलेला मराठी अनुवाद आहे. परभाषेतील अभिजात / मौलिक पुस्तकांचा अनुवाद करून तो मराठी वाचकांना उपलब्ध करून देणे हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट आहे व या उद्दिष्टाला अनुसरून या पुस्तकाचा हा अनुवाद आहे. अलीकडच्या काळात माणसाचे जीवन इतके समस्याग्रस्त झालेले आहे की, माणसाचे जीवन समजून घेण्यासाठी ज्या परिस्थितीत त्याची जडणघडण झालेली आहे ती परिस्थितीदेखील समजून घेणे आवश्यक ठरले आहे. या दृष्टीनेही या ग्रंथाची उपयुक्तता आहे.

Sampurn Gadkari Khand 1: संपूर्ण गडकरी खंड १

by Ram Ganesh Gadkari

नाटककार, विनोदी लेखक आणि कवी म्हणून ख्यातनाम असलेले राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज) यांचे सर्व साहित्य मराठी वाङ्मयाचे भूषण मानले जाते. गेली जवळजवळ शंभर वर्षे या थोर साहित्यकाराच्या प्रतिभेतून निर्माण झालेले वाङ्मय महाराष्ट्राने शिरोधार्य मानलेले आहे. आजही त्यांच्या साहित्याची लोकप्रियता अणूमात्र कमी झालेली नाही. त्यामुळे गडकरी यांचे समग्र वाङ्मय, ज्याला आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची प्रदीर्घ अशी विश्लेषक व आस्वादक समीक्षा प्रस्तावने च्यारुपाने लाभली आहे, ते गडकरी जन्मशताब्दीच्या निमित्ताने पुनर्मुद्रित करावे असे तत्कालीन मंडळाच्या अध्यक्षांनी व सदस्यांनी ठरविले व १९८४ मध्ये ‘संपूर्ण गडकरी’ हा ग्रंथ दोन भागामध्ये प्रकाशित करण्यात आला. ही पुनर्मुद्रित आवृत्ती यथाकाल संपली. महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या या महान साहित्यिकाचे पुनःस्मरण करावे या हेतूने गडकऱ्यांच्या समग्र साहित्याच्या दोन्ही खंडाचे पुन्हा एकवार मुद्रण करून ते महाराष्ट्राच्या नव्या पिढीला उपलब्ध करून द्यावे, असे विद्यमान मंडळाने ठरवले. त्यानुसार आज गडकरी वाङ्मयाचे दोन्ही खंड मराठी वाचकांना सादर होत आहे.

Bharatacha Svatantryaladha 1930-34: भारताचा स्वातंत्र्यलढा: १९३०-३४

by Dr V. N. Kuber

डॉ. वा. ना. कुबेर यांनी या ग्रंथात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील १९३०-१९३४ पर्यंतचा कालखंड घेतला आहे. १९३०-१९३४ या कालखंडात घडलेल्या घटनांचे ते स्वतः साक्षीदार होते. इतकेच नव्हे तर, यातील काही घटनांत त्यांनी स्वतः भाग घेतलेला होता. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या या ग्रंथाची विश्वासार्हता निश्चित वाढलेली आहे. या पुस्तकात भारताचा राष्ट्रवाद हा वंशवादविरोधी, साम्राज्यशाहीविरोधी, धर्मनिरपेक्ष (सेक्युलर), लोकशाहीचा पुरस्कर्ता, आंतरराष्ट्रीय दृष्टी असलेला, मानवतावादी आणि विश्वबंधुत्ववादी असा विकसित झाला आहे असे प्रतिपादन केले आहे. त्यानंतरच्या प्रकरणातून १९१९ ते १९३० या काळातील चळवळीवर परिणाम करणाऱ्या सर्व घटना, विचारप्रवाह यांचा ऊहापोह केला आहे.

Marathyanchya Itihasachi Sadhane Portuguese Daptar Khand 3: मराठ्यांच्या इतिहासाची साधने पोर्तुगीज दप्तर खंड ३

by Shri S.S. Desai

महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित असलेली अशा प्रकारची साधने मराठीत अनुवादून प्रकाशित करण्याचा जो कार्यक्रम मंडळाने आखला आहे त्यातील हे पहिले पुस्तक आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळाने ज्या विविध प्रकाशनयोजना हाती घेतल्या आहेत त्यांमध्ये महाराष्ट्राच्या सर्वांगीण इतिहासाच्या साधनांचे प्रकाशनही अंतर्भूत होते. पोर्तुगीज, डच व फ्रेंच यांचे भारताशी दळणवळण १७ व्या शतकापासून मोठ्या प्रमाणात सुरू होते. त्यांच्या तत्कालीन दप्तरांमधील महाराष्ट्राच्या व भारताच्या इतिहासाची पुष्कळ साधने अजून इतिहास–लेखकांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्याकरिता, पोर्तुगीज, डच, आणि फ्रेंच उत्तम रीतीने जाणणाऱ्या स्वदेशी व विदेशी इतिहास–संशोधकांच्या प्रयत्नांची गरज आहे. श्री. ए. बी. द. ब्रागांस परेरा, अध्यक्ष, पुराणवस्तु संशोधन विभाग, पोर्तुगीज शासन, गोवा, यांनी परिश्रमपूर्वक केलेले संशोधन अनेक खंडांत पोर्तुगीज भाषेत प्रसिद्ध केले. त्यांतील खंड ३ रा, आशिया विभाग, या ग्रंथातील मराठ्यांच्या इतिहासाशी संबद्ध असलेली प्रकरणे श्री. स. शं. देसाई यांनी आस्थापूर्वक मराठीमध्ये परिश्रमपूर्वक हा अनुवाद केला आहे.

Lokjivan Ani Loksanskruti: लोकजीवन आणि लोकसंस्कृती

by Dr D. T. Bhosale

भारतीय उपखंडात प्रगत अशा अनेक ‘जीवनपद्धती’ नांदत होत्या. या विविध संस्कृती सिंधू, सैंधव, आदिम, द्रविड इ. नावाने ओळखल्या जात होत्या. प्राचीन ऐतिहासिक श्रमण संस्कृती अत्यंत समृद्ध आणि परमत्याग करुणेवर आधारित होती. “लोकजीवन आणि लोकसंस्कृती” या ग्रंथातून मराठी साहित्याला एक अप्रतीम देशीकार लेणे लाभत आहे. भारतीय समृद्ध शांतिप्रिय लोकजीवनाची ओळख या ग्रंथातून होत असतानाच मराठी वाचकांना आपल्या जीवनपद्धतीचा नवा अविष्कार घडल्याचा आनंद होईल.

Shri Keshav Kshirsagar Wangmayin Lekhsangrah: श्री. केशव क्षीरसागर वाङ्मयीन लेखसंग्रह

by Prof. Shri K. Kshirsagar

प्रा. श्री. के. क्षीरसागर यांनी १९३० ते १९७९ या पन्नास वर्षांच्या काळात लिहिलेल्या परंतु अद्याप ग्रंथनिविष्ट न झालेल्या लहानमोठ्या एक्याऐशी वाङ्मयीन लेखांचा या संग्रहात समावेश केला आहे. या पुस्तकामुळे आपणांस त्यांची वाङ्मयीन मते नव्यानेच कळणार आहेत असे नाही. पण वेगवेगळ्या नियतकालिकांच्या संचात विखुरलेले त्यांचे विचारधन एकत्र मिळालेले आहे. या लेखसंग्रहात साहित्य आणि स्वातंत्र्यसंग्राम, साहित्य आणि जीवन, मराठी वाङ्मयावरील परकीय संस्कार, कलावंताचे चारित्र्य, आधुनिकता क्या चीज है, अशांसारखे प्रश्न उत्पन्न करणारे लेख आहेत.

Don Santh Vahatach ahe Bhag 2: डॉन संथ वहातच आहे भाग २

by Shri. Narendra Sindkar

श्री. नरेन्द्र सिंदकर यानी जगविख्यात रशियन लेखक मिखैल शोलोखोव् यांच्या ‘ॲण्ड क्वाएट फ्लोज् द डॉन’ या महाकादंबरीचा मूळ रशियन भाषेतून डॉन संथ वहातच आहे भाग २ कादंबरीचा मराठी अनुवाद केला आहे व ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’ तर्फे तो प्रकाशित केला गेला आहे. ही कादंबरी 20 व्या शतकाच्या सुरुवातीला डॉन नदीच्या खोऱ्यात राहणार्‍या कॉसॅक्सच्या जीवनाशी निगडीत आहे. पहिल्या महायुद्धाच्या अगदी आधीपासून 1912 च्या आसपास, ही कथा टाटार्स्कच्या मेलेखोव्ह कुटुंबाभोवती फिरते, जे कॉसॅकचे वंशज आहेत. क्रिमियन युद्धादरम्यान एका तुर्कीला पत्नी म्हणून कैद केले. मेलेखोव्हच्या अंधश्रद्धाळू शेजाऱ्यांकडून तिच्यावर जादूटोण्याचा आरोप केला जातो. ज्यांनी तिला मारण्याचा प्रयत्न केला परंतु तिच्या पतीने त्यांचा सामना केला. त्यांचे वंशज, मुलगा आणि नातवंडे, जे कथेचे नायक आहेत, त्यांना "तुर्क" असे टोपणनाव दिले जाते.

Prabodhankar Thakare Samagra Wangmay Khand 3: प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्‌मय खंड ३

by Prabodhankar Thakare

गेल्या पिढीतील एक थोर समाजसुधारक, विचारवंत आणि निर्भिड विचारांचे पत्रकार म्हणून प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव सर्वपरिचित आहे. पत्रकार म्हणून त्यांनी “प्रबोधन” मधून आपल्या हिंदु समाजातील जुन्या दुष्ट रूढी, अंधश्रद्धा, जातीभेद आणि या सर्वांच्या पाठीमागे असलेल्या वर्णश्रेष्ठत्वाच्या कल्पना यावर अगदी घणाघाती प्रहार केले. म्हणूनच के. सी. ठाकरे या नावापेक्षा “प्रबोधनकार ठाकरे” हेच त्यांचे नाव अधिक परिचित झाले. पण ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाला आणखीही काही पैलू होते. ते केवळ समाजसुधारक आणि तेजस्वी विचारांचे पत्रकार नव्हते. ते स्वतः उत्तम लेखकही होते आणि त्यांच्या लेखनाला कवित्वाचाही स्पर्श होता. प्रारंभीच्या काळात त्यांचा “नाटक” आणि प्रत्यक्ष रंगभूमी यांच्याशी निकटचा संबंध आला होता. समाजसुधारणेचा ध्यास घेऊन त्यांनी अनेक नाटके लिहिली. त्या नाटकांचे आजच्या नव्या पिढीला स्मरण नसले तरी अन्यायावर प्रहार करणारा नाटककार या भूमिकेतूनच त्यांनी हे ललित-लेखन केले आहे.

Tisari Lat: तिसरी लाट

by Sharadini Mohite

तिसरी लाट हे पुस्तक अल्विन टॉफलर यांच्या ‘Third Wave’ चा मराठी अनुवाद आहे. ‘तिसरी लाट’ ह्या पुस्तकात दृष्टिकोण आहे, की काही घटनांचा, प्रक्रियांचा आणि तत्त्वांचा वापर एखादी संस्कृती करून घेत असते. आणि स्वतःचे एक पायाभूत उत्पत्तिशास्त्र तयार करत असते; आणि त्याच्या आधाराने ती वास्तवाचे स्पष्टीकरण करत असते. शिवाय स्वतःच्या अस्तित्वालाही न्याय देत असते. ह्या पुस्तकात एकमेकोंशी टक्कर घेणाऱ्या लाटांचे रूपक योजण्यात आलेले आहे. अतिशय विसंवादी अशा माहितीचे सुसूत्रीकरण हा एकच या रूपकामागचा हेतु नाही; तर त्यायोगे विचारांचा गोंधळ नाहीसा होऊन स्वच्छ, प्रखर प्रकाशामध्ये आपल्याला माहीत असलेल्या गोष्टींचेच परंतु नितळ स्पष्ट चित्र आपल्याला दिसून येते.

Delhichya Shahajahancha Itihas: दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास

by Shri. B.G. Kunte

श्री. ब. प्र. सक्सेना लिखित History of Shahajahan of Delhi चा मराठी अनुवाद आहे. हिंदुस्थानवर राज्य करणाऱ्या सर्व मोगल सम्राटात अतिशय रसिक, रंगेल आणि तितकाच कट्टर धर्माभिमानी म्हणून शहाजहानचा उल्लेख करावा लागेल. आपला बाप जहांगीर याच्या विरुद्ध त्याने अयशस्वी बंड केले. बंडखोरीचे वीष जणुकाही मुसलमान राज्यकर्त्यांच्या अंगी भिनले होते. हीच बंडखोरी औरंगजेबाने केली आणि आपल्या बापाला-शहाजहानला-जीवंतपणी नरकयातना भोगावयास लावल्या. शहाजहानचे चरित्र म्हणजे आनंद आणि शोक यांचा एक आविष्कार आहे. डॉ. सक्सेना यांनी आपल्या ग्रंथात हे चरित्र अष्टपैलूपणे सादर केले आहे.

Dasharupak Vidhan: दशरूपक-विधान

by Prof. R.P. Kangle

भरतमुनींच्या “नाट्यशास्त्र” या अभिजात संस्कृत ग्रंथातील नाटक व नाट्यशास्त्रविषयक अध्याय १८ व १९ चे प्रस्तुत भाषांतर अभिनवगुप्ताच्या “अभिनवभारती” टीकेसह प्रा. र. पं. कंगले, मुंबई यांनी मंडळास करून दिले आहे. नाट्याचे प्रकार, व्याख्या व रचना यासंबंधीचे विवेचन भरतमुनींनी केले आहे. “दशरूपनिरूपणम्‌” नामक अध्याय १८ मध्ये नाटक, प्रकरण वगैरे रूपकाच्या दहा प्रकारांचे वर्णन केले आहे. “इतिवृत्त नामक अध्याय १९ मध्ये कथानकाचा विचार केला आहे. कथानकाच्या अवस्था, अर्थप्रकृती, सन्धी, संघ्यंगे, संध्यंतरे, पताकास्थान इत्यादींचे विवेचन केले असून शेवटी नाटकात सर्वप्रकारच्या लोकस्वभावाचे दर्शन घडवावे असे सांगून नाटकाच्या रचनेविषयी काही सूचना केल्या आहेत. भरताच्या नाट्यशास्त्रात ज्या अनेक विषयांचे विवेचन आहे त्यांपैकी नाटक, प्रकरण आदी रूपकांचे प्राधान्य निर्विवाद आहे. कारण नटांच्या द्वारा रंगभूमीवर प्रस्तुत केले जाणारे जे नाट्य ते मुख्यत्वेकरून ह्या रूपकांच्या प्रयोगाशीच संबद्ध आहे. इतर बहुतेक विषय ह्या नाट्यप्रयोगाच्या संदर्भात अनुषंगाने आले आहेत. तेव्हा रूपकांच्या विवेचनाला ह्या ग्रंथात महत्त्वाचे स्थान असावे यात आश्चर्य नाही.

Savitribai Phule Samagra Wangmay: सावित्रीबाई फुले समग्र वाङ्‌मय

by Dr M. G. Mali

सावित्रीबाई फुले समग्र वाङ्‌मय या डॉ. मा. गो. माळी यांनी संपादित केलेल्या व मंडळाने १९८८ मध्ये प्रसिद्ध केलेल्या पहिल्या आवृत्तीला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर मार्च १९९८ मध्ये या ग्रंथाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली व २००३ साली तिचे पुनर्मुद्रण करण्यात आले. आज ही पाचवी आवृत्ती प्रकाशित करण्याचे मंडळाने ठरविले. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दांपत्यांचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत. एकोणिसाव्या शतकातल्या अशिक्षित, अज्ञानी, पीडित अशा महाराष्ट्रातील बहुजन समाजाला त्यांनी ज्ञानदीप दाखवून चिरंतन स्वरूपाचे मार्गदर्शन केले. आजचा ज्ञानवंत व सुशिक्षित महाराष्ट्र म्हणजे, सावित्रीबाई व ज्योतिबा यांच्या सेवेची फलश्रृती होय. या दांपत्यांचे वाङ्‌मय आजही प्रेरक वाटते.

Acharya Bhagwat Sankalit Wangmay Khand 2: आचार्य भागवत संकलित वाङ्मय खंड २

by Achyut Keshav Bhagwat

आचार्यांची जीवनदृष्टी आणि त्यामागे असलेले तत्त्वज्ञान यावरच्या लेखांचे संकलन पहिल्या खंडात झाले. या दुसऱ्या खंडात प्रा. भागवत यांनी आचार्यांच्या साहित्यविषयक लिखाणाचे संकलन केले आहे. एका रीतीने हे आचार्यांचे साहित्य समीक्षाशास्त्रच होय. आचार्य भागवत यांची जीवन व साहित्य यांच्याकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी होती. त्यामुळे आचार्यांच्या लिखाणाचा हा दुसरा खंड महाराष्ट्रातील नवीन पिढीला नेहमीच स्फूर्तिप्रद होत राहील.

Manasashastra Sadyakalin Prachalit Sampraday: मानसशास्त्र: सद्यःकालीन प्रचलित संप्रदाय

by Mrs Kunda Dabholkar

“मानसशास्त्र: सद्यःकालीन प्रचलित संप्रदाय” हे प्रस्तुत पुस्तक म्हणजे रॉबर्ट एस. वुडवर्थ यांच्या “Contemporary School of Psychology” या पुस्तकाचे हे भाषांतर आहे. “मानसशास्त्र: सद्यःकालीन प्रचलित संप्रदाय” हा ग्रंथ म्हणजे मानसशास्त्राची व्याप्ती, आशय आणि रीत या विषयीच्या कोणत्या भिन्न विरोधी भूमिकांवर ते आधारले होते यासंबंधीची माहिती या पुस्तकातून आपल्याला वाचावयास मिळते. तसेच त्यांचा विकास कसकसा घडत गेला आणि भावी विकासाच्या संभाव्य दिशा कोणत्या होत्या याविषयीही विश्वसनीय आणि उद्‌बोधक माहिती या पुस्तकातून वाचकाला मिळते. शास्त्रीय ग्रंथांची शैली अलिप्त, औपचारिक आणि गंभीर असते. या पुस्तकातील माहितीही व्यापक आणि बिनचूक आहे. विवेचन तर्कशुद्ध आणि पद्धतशीर आहे. सामान्य वाचकाला कंटाळवाणी, नीरस किंवा क्लिष्ट वाटेल अशी एखादी ज्ञानशाखा तिच्या शास्त्रीय स्वरूपाशी प्रामाणिक राहून, आकर्षक स्वरूपात कशी मांडावी याचे, हे पुस्तक म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे.

Swatantryache Bhay: स्वातंत्र्याचे भय

by Dr A. H. Salunkhe

प्रस्तुत पुस्तक म्हणजे एका व्यापक अध्ययनाचा भाग आहे. हे अध्ययन आधुनिक मानवाच्या स्वभावरचनेशी निगडित आहे. तसेच, मानसशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय घटकांच्या परस्परांवर ज्या क्रियाप्रतिक्रिया होतात, त्यांमधून निर्माण होणाऱ्या समस्यांशीही हे अध्ययन निगडित आहे.

Dharmanirpekshata Navhe Ihvad: धर्मनिरपेक्षता नव्हे, इहवाद

by Mahadev Shankar Dhole

मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारसरणीने प्रभावित झालेल्या श्री. महादेव शंकर ढोले यांनी आपल्या पुस्तकास “धर्मनिरपेक्षता नव्हे, इहवाद” असे शीर्षक देऊन या वादातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सर्वंकष स्वरूपाच्या धर्माचा जबरदस्त पगडा असलेल्या भारतासारख्या देशातील समाजात इहवादी शासनाची निर्मिती करणे हे अत्यंत कठिण असले तरी अशक्य नाही असे घटनेच्या शिल्पकारांना वाटत होते. भारताची घटना अस्तित्वात आली त्यालाही चाळीस वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. तरीही येथील शासन अधिकाअधिक इहवादी होण्याऐवजी सर्वधर्मसमभावाचे कातडे पांघरुन धर्माधिष्ठीत चळवळी धुमाकूळ घालीत असल्याचे विपरीत दृश्य दिसत आहे. अशा परिस्थितीत पाश्चिमात्य देशातील तसेच आधुनिक भारतातील विचारवंतांच्या इहवादाबद्दलच्या चिंतनाचा मागोवा घेत विश्लेषण करण्याचा श्री. ढोले यांनी प्रयत्न केला आहे.

Parivartanachi Kshitije: परिवर्तनाची क्षितिजे

by Dr S. S. Bhosle

‘दलितमित्र’ रा. ना. चव्हाण यांचे निवडक लेख तसेच सतत पन्नास वर्षे किती विपुल आणि विविध विषयांवर मूलगामी चिंतन करणारे लेखन केले आहे. त्यांच्या लेखनामागील वृत्तीही समंजस, अनाग्रही सुधारकाची. लेखनात काटेकोर शब्दरचना आणि समतोल वृत्ती. कोठेही अभिनिवेश वा आक्रस्ताळेपणाचा मागमूस नाही. बहुजन समाजाने अज्ञानाची अंधारी वाट सोडून ज्ञानाचा प्रकाशमय मार्ग धरला पाहिजे, तीच खरी मुक्ती, हे त्यांच्या विचाराचे प्रमुख सूत्र. बहुजन समाजाच्या प्रबोधनाच्या इतिहासात त्यांचे स्थान अढळ राहील यात काही शंका नाही. त्यांचे हे वैचारिक संचित आजच्या नवीन पिढीला लाभावे यासाठी साहित्य-संस्कृती मंडळाने “परिवर्तनाची क्षितिजे” या शीर्षकाने त्यांच्या विविध विषयांवरील चिंतन एकत्र केले आहे.

Krantisukte Rajarshi Chhatrapati Shahu: क्रांतिसूक्ते: राजर्षी छत्रपती शाहू

by Dr S. S. Bhosle

विविध संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समा-समारंभात कधी अध्यक्ष म्हणून तर कधी उद्‌घाटक किंवा मुख्य पाहुणे म्हणून शाहू महाराजांनी जी भाषणे केली त्याचे संग्रह अनेक वर्षापूर्वी प्रसिद्ध झाले होते. मात्र जसजसा काळ लोटतो तसतसे या भाषणांचे संदर्भ पुढील पिढ्यांना समजावून घेणे अवघड होत जाते. अशा स्थितीत कोणी ही भाषणे टिपा-टिप्पणीसह चिकित्सक वृत्तीने प्रसिद्ध केली तर नव्या पिढीच्या वाचकांची व अभ्यासकांची सोय होते. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळींचे एक साक्षेपी अभ्यासक डॉ. एस्. एस्. भोसले यांनी राजर्षी शाहू छत्रपतींच्या भाषणांचा टिपा-टिप्पणीसह केलेला हा चिकित्सक अभ्यास वाचकांना उपयुक्त वाटेल.

Ramayanavar Nava Prakash: रामायणावर नवा प्रकाश

by Bhaskarrao Vithojirao Jadhav

रामायण व महाभारत या काव्य ग्रंथांना भारताच्या सांस्कृतिक संचितामध्ये अनन्यसाधारण स्थान लाभले आहे. त्यातील व्यक्तीरेखांनी कोट्यवधी माणसाच्या मनावर इतकी मोहिनी घातली आहे की त्यांच्या दृष्टीने राम किंवा कृष्ण या केवळ ऐतिहासिक व्यक्ती राहिलेल्या नसून ती श्रद्धास्थाने बनली आहेत. सर्वसामान्य भारतीय त्यांना अवतारी पुरुष मानतो आणि त्यांच्या मूर्तीची पूजा करतो. इंग्रजी राजवटीत पाश्चात्य पंडितांनी रामायण व महाभारत हे ग्रंथ होमरच्या इलियड व ऑडिसीवरून रुपांतरित केले असावेत असे प्रतिपादन करण्यास सुरुवात केली. तेव्हा न्यायमूर्ती काशीनाथ त्र्यंबक तेलंगानी त्याचे सप्रमाण खंडन केले. तरीही रामायणाचे मूळ इजिप्तमध्ये असल्याचे मत मल्लादि वेंकटरत्नम यांच्यासारखे विद्वान पुढील काळातही व्यक्त करीत असताना दिसतात. रामायणासंबंधी पंडितांमध्ये चाललेल्या या वादात १९३४ ते १९३६ या काळात भास्करराव जाधवही हिरीरीने उतरले. रामायणासंबंधी भास्कररावांनी त्या काळात “ज्ञानमंदिर”, “महाराष्ट्र शारदा” या नियतकालिकांमध्ये लेख लिहून टीकेचे मोहोळ उठवले होते. “रामायणावर नवा प्रकाश” वाल्मीकी रामायणावरील संशोधनात्मक लेख या पुस्तकात त्याचे हे लेख एकत्रित करण्यात आले आहेत.

Visave Shatak Ani Samajwad: विसावे शतक आणि समाजवाद

by Prof. K.N. Valsangkar

आपल्या कल्पनेतील समाजवादी समाजाच्या जीवनाचे कलाक्तक चित्र कल्पक लेखकांनी रंगविले आहे. वास्तववादी इतिहासकारांनी समाजवादी विचार आणि आचारातील प्रगतीच्या मार्गातील निरनिराळ्या गटांचा मागोवा घेतला आहे. भविष्यातील समाजवादी समाजाची घटना राजकीय सैद्धांतिकांनी तयार केली आहे. अर्थशास्त्रज्ञांनी समाजवादी अर्थव्यवस्थेबाबत चर्चा केली आहे; एवढेच नव्हे तर सत्ता मिळाल्यास प्रत्यक्ष काय कृती केली जाईल याची माहिती देणारे अनेक कार्यक्रम समाजवादी पक्षाने मांडले आहेत. समाजवादी नीतिशास्त्राच्या भूमिकेतून आर्थिक व्यवस्थेच्या क्षेत्राचा विचार या ठिकाणी अभिप्रेत आहे. “समाजवाद हा मूलतः नैतिक प्रश्न आहे आणि मानव व त्याचे बांधव यांच्यातील परस्पर संबंधाशी समाजवाद प्रामुख्याने निगडीत आहे.” चांगल्या समाजाच्या आमच्या कल्पनेत अंतर्भूत असलेला आदर्शवाद आणि असा समाज प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक असलेला वास्तववाद या दोहोंचा समन्वय साधणाऱ्या उद्याच्या समाजवादी अर्थव्यवस्थेबाबत व्यापक नि तर्कनिष्ठ भूमिका मांडणे हाच हेतू आहे.

Refine Search

Showing 1,026 through 1,050 of 1,427 results